महागड्या भाजीपाल्याला आरोग्यदायी पर्याय; ठाकरी मिरचीला मोठी मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वातावरणातील बदल आणि पावसाची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने पुणे व नवी मुंबईतून येणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र, या महागड्या भाजीपाल्याला सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी पिकवलेल्या सेंद्रिय गावरान भाज्यांचा एक स्वस्त, पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या स्थानिक बाजारात गावरान भाज्यांची आवक प्रचंड वाढली असून, ठाकरी मिरचीला मोठी मागणी आहे.
आदिवासी बांधव व स्थानिक शेतकरी डोंगर-उतारावर, रानमाळावर आणि घराच्या परसात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा किटकनाशकांचा वापर न करता या भाज्या पिकवतात. आणि आदिवासी महिला बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. बाजारात सध्या शिराळे, घोसाळे, कारली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, गवार आणि ठाकरी मिरची मुबलक प्रमाणात दाखल झाली आहे. अवघ्या 15 ते 20 रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो अशा परवडणाऱ्या दरात या भाज्या मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे.
ठाकरी मिरचीची खास भुरळ
या सर्व गावरान भाज्यांमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने पिकवलेली ‘ठाकरी मिरची’ (ज्याला बुटकी किंवा ठेंगू मिरचीही म्हणतात) विशेष आकर्षण ठरत आहे. अतिशय तिखट आणि चविष्ट असलेली ही ठाकरी मिरची तेलात तळून, हळद-मीठ लावून वाळवून किंवा तिचे लोणचे करून खाल्ली जाते. या मिरचीचा ठेचा अथवा चटणी जेवणाची चव वाढवणारी ठरते.
गावरान भाज्या पौष्टिक व सेंद्रिय असल्याने अत्यंत आरोग्यदायी आहेत. विशेषतः ठाकरी मिरची या पारंपारिक वाणाला पेटंट मिळायला हवे. आदिवासी व ठाकूर बांधवांना योग्य हमीभाव, हक्काची बाजारपेठ आणि शास्त्रीय मार्गदर्शन मिळाल्यास, इतर हंगामांतही उत्पादन घेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावता येईल.
राजू बांगारे,
शिक्षक, सुधागड






