| आगरदांडा | प्रतिनिधी |
ऐतिहासिक मुरूड नगरीतील परेश नाका परिसरातील समुद्रकिनारी रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने रायगड सुरक्षा चषक 2026 कबड्डी साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी सुरक्षा दलातील जवान आणि मच्छिमार बांधवांमध्ये सागरी सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने या बीच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून तसेच मुरूड, तळा आणि रोहा या सागरी पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन मुरूड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडत आहे.या स्पर्धेत महिला गटात मुरूड आणि रोहा संघ सहभागी झाले असून, पुरुष गटात मुरूड, रोहा आणि तळा या तीन संघांमध्ये चुरशीचे सामने रंगणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 10 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रुपये, उपविजेत्या संघाला 31 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 21 हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा शुभारंभ कोस्ट गार्ड अधिकारी अभिषेक करुणाकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्व खेळाडूंना सागरी सुरक्षा आणि क्रीडा शिस्तीची शपथ देण्यात आली.स्पर्धेसाठी पंच म्हणून अमोल नलावडे आणि नितीन समजीसकर यांनी जबाबदारी सांभाळली. पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी जंगम यांच्या शुभहस्ते नाणेफेक करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, ताबीश ढाकम, पोलीस मकरंद पाटील, पोलीस नाईक किशोर बठारे, रायगड जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख ऋषिकेश साखरकर, कोस्ट गार्ड अधिकारी अभिषेक करुणाकर, श्रीकांत खोत, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दीपक राऊळ, विश्वनाथ पाटील, राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल, मारुती म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.समुद्रकिनारी रंगणाऱ्या या अनोख्या कबड्डी स्पर्धेमुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच सागरी सुरक्षा, मच्छिमार बांधव आणि सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे. रायगड सुरक्षा चषक 2026 हा उपक्रम क्रीडा आणि सागरी सुरक्षा जनजागृतीचा अनोखा संगम ठरत आहे.
सागरी सुरक्षा जनजागृतीसाठी बीच कबड्डी स्पर्धा
