दुकानातील मिठाई खाल्याने मारहाण; तरुणाचा मृत्यू

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

किराणा दुकानातील मिठाई काढून खाणाऱ्या तरुणाला दुकानदारासह तिघांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना महापे एमआयडीसीत घडली आहे. यावेळी मृत तरुणाचा मित्र त्याला सोडवण्यासाठी गेला असता, त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी किराणा दुकानदारासह तिघांना अटक केली आहे.

जुयेल इमरान शेख (24) याचा मारहाणीत मृत्यू झाला असून इरफान लतीफ शेख (28) हा जखमी झाला आहे. हे दोघेही पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास असून गुरुवारी (दि.10) ते महापे येथील अडवली भुतवली येथे राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. मात्र मित्राची भेट न झाल्याने जुयेल आणि इरफान हे दोघेही पायी चालत परतीच्या मार्गावर निघाले होते. यावेळी ते महापे एमआयडीसीतील एकविरा झोपडपट्टीजवळ आले असताना, तेथील एका किराणा मालाच्या दुकानात पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले. यावेळी जुयेल याने किराणा मालाच्या दुकानात काऊंटरवर असलेल्या मिठाई बॉक्समधुन मिठाईचे दोन तुकडे काढून घेतले. यावरुन दुकानदार अनिलकुमार गौतम याने जुयेल याला शिवीगाळ केली. यावरुन त्यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर अनिलकुमार व त्याच्या दोघा साथीदारांनी जुयेल याला लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी इरफान शेख त्याला सोडवण्यासाठीमध्ये गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जुयेल गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मारहाणीमुळे जुयेलच्या शरीरामध्ये अंतर्गत दुखापती झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत जुयेलचा मित्र इरफान शेख याने दिलेल्या तक्रारीवरुन रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अनिलकुमार गौतम, संदेश जाबर व सुरसिंग जामोदा या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Exit mobile version