| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरालगत असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर सीएनजी विक्रीचे मोठमोठे फलक झळकत असताना प्रत्यक्षात मात्र बायोगॅसची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. सीएनजीच्या नावाखाली वेगळाच गॅस मिळत असल्याने वाहनचालकांची आर्थिक लूट तर होत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. बायोगॅस भरल्यानंतर रिक्षांना अपेक्षित मायलेज मिळत नसून, वारंवार रिक्षा बंद पडत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत. याबाबत पंप मॅनेजर नाना मुंढे यांना जाब विचारला असता, महानगर गॅसकडून सीएनजीचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिक्षाचालक आणि पंप मॅनेजर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगीही झाली. या प्रकाराविरोधात संतप्त रिक्षाचालकांनी पेण तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार सतीश शिंदे यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी चौकशी करून पंपाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. सीएनजीचा फलक लावून प्रत्यक्षात बायोगॅसची विक्री होत असेल, तर हा ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रकार नाही का? संबंधित विभागाने केवळ आश्वासन न देता तातडीने प्रत्यक्ष तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे.







