जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान खारघर येथे झालेल्या दुर्घटनेला एक महिना उलटून गेला तरी काहीच हालचाल नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सोमवारी अलिबाग एसटी स्टँडवर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करीत शासनाविरोधात निदर्शने केली.
अंनिसचे राज्य सचिव नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खारघर येथील दुर्घटनेला 16 मे रोजी एक महिना उलटून गेला आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी अंनिसतर्फे शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत अजून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे अंनिसच्या अलिबाग शाखा आणि समविचारी संघटना व व्यक्ती यांच्यातर्फे अलिबाग एसटी स्थानक येथे डोळ्याला पट्टी बांधून शांततामय पद्धतीने आंदोलन करत शासनाविरोधात निदर्शने करुन लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना देण्यात आले.
या निवेदनानुसार, दि. 16 एप्रिल रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या शासन व स्थानिक संयोजक आणि ज्यांनी श्री भक्तांना गैरसोयीच्या वेळेत आपल्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले, त्यांचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाहीर निषेध करत आहे. खारघर येथील या सोहळ्याच्या आयोजनामध्ये गंभीर त्रुटी व ढिसाळ नियोजन यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले, मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात समिती सहभागी आहे. केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अनेक मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा या कामाला लावली होती. शासनाचे सर्व विभाग या कामात सक्रीय होते. शासनात असणाऱ्या नेत्यांनी एका व्यक्तीसाठी, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम भरउन्हात ठेवला. सरकारी तिजोरीतून करोडो रुपये खर्च केले, ही बाब चिंतनीय आहे. ही दुर्घटना घडली याची जबाबदारी कोणाची? महाराष्ट्र शासन, त्याचे प्रशासन व पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि श्री परिवाराचे प्रमुख पदाधिकारी यांनी ही जबाबदारी घेऊन झालेल्या घटनेबद्दलच जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
दि. 22 मे रोजी महा-अंनिस व समविचारी संस्था व व्यक्ती डोळ्यावर बांधून शांततामय पद्धती आंदोलन करीत आहोत व या घटनेची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करून दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मार्फत करण्यात आले. ही घटना आपल्या कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात येत असल्याने आपण योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
खारघर येथील दुर्घटनेला 16 मे रोजी एक महिना उलटून गेला आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी अंनिसतर्फे शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत अजून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे अंनिसच्या अलिबाग शाखा आणि समविचारी संघटना व व्यक्ती यांच्यातर्फे अलिबाग एसटी स्थानक येथे डोळ्याला पट्टी बांधून शांततामय पद्धतीने आंदोलन केले.
नितीन राऊत, अंनिस राज्य सचिव