सेक्टर 2 मध्ये जोरदार कारवाई
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत अतिक्रमणाचा मुद्दा गाजल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनधिकृत अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात येत असून, नुकतीच नवीन पनवेल सेक्टर 2 येथे जोरदार कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही फटका बसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 2 मधील पनवेल महानगरपालिकेच्या दैनिक बाजारासाठी आरक्षित असलेल्या क्षेत्रात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत परिसरातील व्यावसायिकांचे साहित्य हटविण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करणारे काही मराठी फेरीवालेही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. या कारवाईदरम्यान, “आम्ही गेल्या दहा वर्षांपासून येथे व्यवसाय करीत आहोत,” अशी भूमिका काही फेरीवाल्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले. मात्र, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत त्यांच्या व्यवसायाच्या जागाही मोकळ्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून उभा केलेला व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे साधन गमावल्याची भावना फेरीवाल्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच, केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेअंतर्गत काही फेरीवाल्यांनी 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर काहींनी 20 हजार रुपयांपर्यंतचे पुढील कर्जही घेतल्याचे सांगितले जाते. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर्जाचे हप्ते भरण्याचे नियोजन असताना आता व्यवसायाची जागाच गेल्याने कर्जफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.






