| नेरळ | वार्ताहर |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (22 मे) रोजी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या मार्गातील खड्डेमय रस्त्यांचे विघ्न दोन दिवसात दूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या ठिकाणापासून कार्यक्रम स्थळापर्यंतच्या मार्गावरील खडगाळ रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी दरवर्षी यावे अशी प्रतिक्रीया कर्जतकरांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील नेरळ जवळील मालेगाव येथे असलेल्या सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्रावर मुख्यमंत्री येत आहेत. मुख्यमंत्री हे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून तेथील कृषी, जल आणि पर्यावरण विषयक प्रकल्पांची पाहणी या भेटीमध्ये मुख्यमंत्री करणार आहेत. मात्र या निमीत्ताने कार्यक्रम स्थळाकडे जाणारे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त केले आहेत.
नेरळ कळंब या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षे असून दहिवली पुलापासून कोदिवले या दरम्यान गतवर्षी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तो रस्ता अल्पावधीत खराब झाला असून पुढील 10 किलोमिटर रस्त्यावर अगणित खड्डे आहेत.स्थानिक वाहनचालक आणि प्रवासी रिक्षा संघटना यांनी अनेकदा तक्रारी करून देखील या रस्त्याचे डांबरीकरण शासनाने केले नव्हते. तर नेरळ कळंब रस्त्यापासून मालेगाव आणि तेथून जगातील दर्जाचे कृषी पर्यटन केंद्र असलेल्या सगुणाबाग कडे जाणारा रस्ता अनेक वर्षे डांबरीकरणाचे प्रतीक्षेत आहे.मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आगमनाने मुख्यमंत्री यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत.हेलिपॅड पासून सगुणाबाग कडे जाणारा रस्ता डांबरी झाला असून या बदलाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
काहीही असू द्या मात्र मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्यावरील खड्डे कमी झाले हेच मोठे काम त्यानिमित्ताने झाले अशा असंख्य प्रतिक्रिया अवघ्या दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे गायब झाल्याबद्दल स्थानिक समाधान व्यक्त करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रात्रीचा दिवस करून रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून भरण्याचे काम केले गेले आहे.