कर्जत येथील सगुणाबागेत शेतकऱ्यांचा सत्कार
| नेरळ | प्रतिनिधी |
बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असून, शेखर भडसावळे यांनी विकसित केलेली सगुणा राईस तंत्र म्हणजे ‘एसआरटी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दैनंदिन कार्यक्रमाचा भाग असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील शेतकरी आनंदी राहिला पाहिजे, त्याचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी भडसावळे यांनी विकसित केलेले एसआरटी तंत्रज्ञान राज्य सरकारने आत्मसात करावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. नेरळ मालेगाव येथील एसआरटी शेतकी कृषी सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
नेरळजवळील मालेगाव येथे असलेल्या सगुणाबाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळ्याचे सोमवार, दि. 22 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे, देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत प्रमुख चैतराम पवार, कृषी प्रकल्प संचालक डॉ. परिमल सिंह, कोकण विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रमोद पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कृषी संचालक विजय कोळेकर, कोकण कृषी अधीक्षक अंकुश माने, दहिवली सरपंच मेघा मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसआरटी हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान असून, हे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, ही निश्चित चांगली गोष्ट असून, ही बदलाची नांदी आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांत 50 हजारांहून अधिक शेतकरी सगुणा राईस तंत्र वापरून शेती करीत आहेत. त्या शेजारच्या आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतील शेतकरी याच पद्धतीने शेती करीत असल्याने आपल्या राज्यातदेखील हे तंत्र सरकार सर्वांसाठी विकसित करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. कृषीभूषण शेतकरी व एसआरटीचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे याना मी याअगोदर पासून ओळखत असून, जेव्हा शेतीचा विषय निघतो तेव्हा भडसावळे यांचे नाव साहजिकच माझ्या तोंडून निघते. आनंदी शेतकरी सशक्त भूमाता ही चळवळ झाली पाहिजे. तर, एसआरटी तंत्रज्ञान हे थायलंड, जपान याठिकाणी चंद्रशेखर भडसावळे व त्यांच्या संपूर्ण टीमने पोहचवले आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमात एसआरटी शेतकरी परशुराम आगीवले, अनिल निवळकर, कृषी अधिकारी विजय कोळेकर आणि भूमातेचे चित्रकार राकेश देवरुखकर यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याआधी भूमाता प्रतिमा पूजन आणि ीरर्सीपर र्षेीपवरींळेप.पसे या वेबसाईटचे प्रकाशन मुख्मंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली केळकर यांनी केले. या कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, शिवसेनेचे पदाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, अमर मिसाळ, शिवराम बदे, मनोहर थोरवे, भाजप तालुका मंगेश म्हसकर, नेरळ सरपंच उषा पारधी, ठाणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी नरेंद्र शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
तपश्चर्या फुकट जाणार नाही
तब्बल बारा वर्षे शेतीमध्ये संशोधन करुन चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटी तंत्रज्ञान निर्माण केले आहे. त्यांची ही तपश्चर्या फुकट जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकार कृषी विभागामार्फत हे तंत्र विकसित करण्यासाठी राज्यभर प्रचार-प्रसार करेल, असे आश्वासन त्यांनी देिल. विविध 25 प्रकारच्या पिकासाठी विकसित केलेले हे तंत्र महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवेल, असा विश्वास व्यक्त करुन भडसावळे यांनी सुरू केलेली ही चळवळ राज्याच्या सर्व भागात पोहोचवली पाहिजे, यासाठी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.