कर्जतकरांमध्ये नाराजी
| नेरळ | वार्ताहर |
राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या भागात जातात, त्यावेळी त्या भागातील भविष्यातील समस्या यांना मार्ग निघत असतात. मात्र सोमवारी (दि.22) कर्जत तालुका भेटीवर आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत तालुक्याच्या विकासाच्या बाबत आपल्या भाषणात एकही शब्द काढला नाही. तर याच आठवड्यात यावर्षीच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेले एव्हरेस्ट सर करणारे देशातील दुसरे गिर्यारोहक कर्जत तालुक्यातील असताना त्यांचा नामोउल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात केला नाही. दरम्यान, एव्हरेस्ट संतोष दगडे यांना शुभेच्छा देणारे मुख्यमंत्री आपल्या राज्यातील एव्हरेस्ट वीराला विसरले काय?यांबद्दल खमंग चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे.
मुख्यमंत्री नेरळ जवळील सगुणाबाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्या भागातील प्रश्नांना मार्ग निघत असतो. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई, आरोग्य व्यवस्था आणि काही महत्वाचे पायाभूत प्रकल्प यांच्यावर भाष्य करतील आणि ते प्रश्न मार्गी लागतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरमधून आले आणि जेमतेम दीड किलोमीटर प्रवास कारमधून करुन कार्यक्रम स्थळी पोहचले आणि पुन्हा कारमधून हेलिपॅड येथे आले आणि ठाणेकडे प्रयाण करून निघाले. त्यांच्या या दीड तासांच्या भेटीत कर्जत तालुक्याला काय मिळाले? तर याचे उत्तर काही नाही, असे सर्व जनता जाहीरपणे सांगत आहे.
मुख्यमंत्री येणार म्हणून जिल्ह्याचे सरकारी यंत्रणा पाच दिवस राबत होती. मुख्यमंत्री यांच्यासाठी हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ या मार्गावरील रस्ते वगळता अन्य कोणतीही कामे शासनाने या ठिकाणी तत्परतेने पूर्ण केली नाही. मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक खा. श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित होते, असे असताना कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्याबाबत एकही घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून झालेली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचेअनेक बॅनर तालुक्यात लागले होते. मात्र कार्यक्रमासाठी आलेले ठिकाण हे कर्जत तालुक्यात आहे आणि आपण कर्जत तालुक्याला काहीतरी दिले पाहिजे याचे स्मरण झाले नसावे, याचे बद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.
एव्हरेस्ट वीर संतोष दगडे यांना विसरले…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातून माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर निघालेले चार गिर्यारोहक यांना ठाणे येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार तुम्हाला मदत करील, असे आश्वासन दिले होते. तेच चार गिर्यारोहक यांच्यापैकी संतोष दगडे यांनी दि.17 रोजी माऊंट एव्हरेस्ट सर केले, तर अन्य तिघे माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प चार पर्यंत जावून आपली मोहीम थांबवून सुखरूप घरी परतले आहेत. जगातील सात गिर्यारोहक यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि त्यात महाराष्ट्र राज्यातील संतोष दगडे यांनी एव्हरेस्ट सर केले. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून कर्जत तालुक्यात येवून देखील संतोष दगडे यांचे अभिनंदन आणि कौतुक आपल्या भाषणात न करावे हे जनतेला रुचले नाही. मुख्यमंत्री यांच्याकडून आपल्या भाषणात एव्हरेस्ट वीर यांच कर्जत तालुक्यातील आहेत याची आठवण नसावी हे देखील खटकणारे आहे. शासनाने या एव्हरेस्ट मोहिमेला निघालेल्या वीरांना देखील शासकीय पातळीवर काही मदत केली नाही, अशी माहिती देखील पुढे येत आहे.
हुतात्ममे क्रांतिकारकांना विसरले
राज्याचे मुख्यमंत्री हे कर्जत तालुक्यातील दोन्ही हुतात्मे यांच्या बलिदानाचे कार्यक्रमाला गेली काही वर्षे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हजर असायचे. मात्र खुद्द कर्जत तालुक्याचे भेटीवर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्म्यांच्या नावाचा साधा उल्लेख न होणे याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सगुणा बागेचे निर्माते हे देखील एक स्वातंत्र्यसैनिक आहेत यांचे स्मरण माहिती खात्याकडून मुख्यमंत्री यांना करून देण्यात आले नव्हते काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.