कृषी, जल आणि पर्यावरण विषयक प्रकल्पांची करणार पाहणी
| नेरळ | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे उद्या (दि.22) नेरळ जवळील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात भेट देणार आहेत. कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या जल, कृषी आणि पर्यावरण विषयक प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्याचवेळी सगुणा रुरल फाऊंडेशन कडून आयोजित सगुणा राईस टेक्निक पद्धतीने शेती करणाऱ्या राज्यातील 30 शेतकऱ्यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत होणार आहे.
कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी विकसित केलेल्या एसआरटी पध्यतिने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा नेरळ जवळील सगुणाबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. 22 मे रोजी हा सोहळा साजरा होणार असून सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात एसआरटी पध्यतीने शेती करणाऱ्या 30 शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
शेतकरी सत्कार सोहळा आणि भडसावळे यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या कृषी, जल आणि पर्यावरण विषयक प्रकल्पांना राज्याचे मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा धुळे येथील चैतराम पवार, खा. श्रीरंग बारणे, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कृषी प्रकल्प संचालक डॉ.परिंमल सिंह, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कोकण कृषी अधीक्षक अंकुश माने हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.