| पनवेल । वार्ताहर ।
दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने खांदा कॉलनीतील ज्वेलर्सच्या सोनारावर चाकू हल्ला करण्यात आला. यानंतर लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुखविंदर जसबीरसिंग धामी (32) या लुटारूला नागरिकांनी पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खांदा कॉलनी सेक्टर 6 भागात घडली. या घटनेत सोनार आणि लुटारू दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुकेश जैन यांचे खांदा कॉलनी सेक्टर 8 मध्ये विजय श्री नावाची ज्वेलर्स पेढी आहे. बुधवारी (ता. 15) रात्री आरोपी सुखविंदर धामी हा जैन यांच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. त्याने सोन्याच्या तीन चेन पसंत केल्यानंतर सदर दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जैन यांनी त्याला अडवल्यानंतर त्याने जैन यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर तो तीन चेन घेऊन पळून जाताना, जैन यांनी आरडा-ओरड केली. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी आरोपी सुखविंदर धामी याला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला खांदेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. धामी आणि त्याला मारहाण करणार्या नागरिकांविरोधात खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.