तरतूद नोंदवहीवरून जिल्हा परिषदेत शीतयुद्ध!

अध्यक्षांच्या मनमानीविरोधात सभापतींचे नाराजीचे सूर; वादात अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षाने डोके वर काढले आहे. यावेळी तरतूद नोंदवहीवरून अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि विविध खात्यांच्या सभापतींमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. अध्यक्षांच्या मनमानी कारभाराबाबत सभापतींमध्ये नाराजीचे सूर उमटत असून, या वादात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हा परिषदेवर भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी या महायुतीची सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपचे मंगेश वाकडीकर यांच्याकडे आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रसार माध्यमांना माहिती देण्यास सभापतींसह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना बंदी घालणारा आदेश काढल्याने वाकडीकर चर्चेत आले होते. या निर्णयावरून त्यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप झाले होते. ‌‘तुघलकी फतवा‌’ आणि ‌‘पारदर्शकतेची गळचेपी‌’ अशी टीकाही झाली होती. अखेर स्वीय सहाय्यकांच्या नजरचुकीने शब्द लिहिले गेल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्यात आला.

आता पुन्हा अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी बांधकाम, अर्थ, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच कृषी सभापतींकडून तरतूद नोंदवहीची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती मधुकर पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह अनेक सभापतींनी या मागणीला विरोध केल्याची माहिती आहे. सभापतींच्या परवानगीशिवाय तरतूद नोंदवही सादर करता येणार नाही, असे लेखी पत्र बांधकाम विभागाकडून अध्यक्षांना देण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी अध्यक्षांनी जिल्हा परिषद सभागृहात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बांधकाम अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी झापल्याने काही वेळ अधिकाऱ्यांमध्येही नाराजीचे सूर उमटल्याची चर्चा आहे. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. तरतूद नोंदवहीवरून अध्यक्ष आणि सभापतींमध्ये अंतर्गत शीतयुद्ध पेटल्याचे चित्र असून, या वादामुळे जिल्हा परिषदेतील प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तरतूद नोंदवहीवरून सभापतींसोबत कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. नोंदवहीची मागणी करणे ही प्रशासकीय बाब आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार केला जात नाही.

मंगेश वाकडीकर,
अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version