115 कुटुंबाची रोजीरोटी मार्गी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अकस्मात निधन किंवा कार्यमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कुटुंबाचा गाडा चालावा, यासाठी पात्र असलेल्या वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात येते. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेने मागील तीन वर्षात वेळोवेळी अनुकंपा भरती प्रक्रिया राबविली असून, या भरती प्रक्रियेतून 115 कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून सोडवण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी दिली आहे.
शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागील काही वर्षांपासून अनुकंपा भरती रखडली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा भरती प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांचा आढावा घेवून अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर अनुकंपा भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येऊन, पात्र असलेल्या वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पारदर्शकपणे ही अनुकंपा भरती प्रक्रिया राबविली आहे.
अनुकंपा भरती प्रक्रियेतनियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांनी त्यांना मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करण्यावर भर देण्यात यावा. नियमांमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी केले आहे.