दौलतगडावर दुर्गसेवकांकडून संवर्धन मोहिम

कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय काम; तरुणांना गाईड प्रशिक्षणातून रोजगाराची मागणी

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला दौलतगड सध्या संवर्धन कार्यामुळे चर्चेत आला आहे. दौलतगड प्रतिष्ठान, दुर्गविश्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,आणि रॉयल रायगडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्याने येथे स्वच्छता व संवर्धन मोहिमा अविरतपणे राबविल्या जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेत शंभरहून अधिक दुर्गसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मोहिमेत मंदिर परिसर, दुर्लक्षित प्राचीन तलाव, ढासळलेली तटबंदी, बुरुज आणि पाण्याच्या टाक्यांभोवती वाढलेली झाडे-झुडपे मुळासकट काढण्यात आली. विखुरलेले दगड पुन्हा रचून तटबंदीला बळकटी देण्यात आली. बेजबाबदार पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिक कचरा अनेक पोत्यांत भरून गडाखाली आणण्यात आला. दिवसभराच्या श्रमदानानंतर पोवाडे, अभंग आणि गोंधळाने परिसर शिवमय झाला. या संपूर्ण कार्याचे वैशिष्ट्‌‍य म्हणजे आतापर्यंतच्या सर्व मोहिमा कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केवळ दुर्गसेवकांच्या स्वखर्चातून राबविल्या गेल्या आहेत.

सध्या गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने साहित्य वाहतुकीस आणि वृद्ध-महिला पर्यटकांना चढाईत अडचणी येतात. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसणे ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पक्का मार्ग, जलव्यवस्था, मंदिर व तलावाची शास्त्रोक्त बांधणी, तटबंदी-बुरुजांचे पुरातत्व विभागामार्फत संवर्धन, माहिती फलक, सुरक्षा, स्वच्छतागृहे आणि स्थानिक तरुणांना गाईड प्रशिक्षणातून रोजगार या मागण्या जोर धरू लागल्या आहेत.

स्वबळावर दौलतगड सजला असला तरी शास्त्रीय संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी शासन आता ठोस पाऊल उचलणार का, हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात मासिक मोहिमेतून मंदिर व तलावाचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार दुर्गसेवकांनी केला असून अधिकाधिक शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. शासनाने वेळीच सहकार्य केल्यास हा दुर्लक्षित गड पर्यटन नकाशावर झळकून स्थानिक विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. याप्रसंगी निलेश निवाते, श्रीकृष्ण पवार, सानिका सावंत, कर्तव्य जाधव यांच्यासह अनेक युवक, महिला व ज्येष्ठांनी वेळ आणि पैसा खर्च करून हा ऐतिहासिक ठेवा जतन केला आहे. दर महिन्याला एक मोहीम या नियोजनाने काम सुरू असले तरी मोठ्या बांधकामासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

मंदिर परिसर आणि तलावाची पूर्ण बांधणी करण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत सर्व मोहिमा शासकीय मदत न घेता स्वखर्चातून केल्या आहेत. रस्ता, पाणी आणि तटबंदीची कामे बाकी आहेत. शासनाने मदत केली तर गड पुन्हा वैभवाने उभा राहील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.

निलेश निवाते,
संस्थापक अध्यक्ष, दौलतगड प्रतिष्ठान
Exit mobile version