सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वाहनांची कोंडी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
कोरोनाचे अरिष्ट असतानाही मुरूड मासळी मार्केट परिसरात शुक्रवारी मासळी खरेदीसाठी नागरिकांची सकाळी 11 वाजता मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून येत होते. रस्त्यावरच मासळी विक्री होत असल्याने रस्ता जाम झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
गुरुवारनंतर शुक्रवार हा मोकळा वार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी मासळी खरेदीसाठी उसळली होती. कोलंबी, पापलेट, खेकडे, जिताडा, बोंबील, मांदिली आदी मासळी मार्केटमध्ये दिसून येत होती. पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवारपासून पाऊस पडायला पुन्हा सुरुवात झाल्याने भात लावणीला सुरुवात झाली आहे. खाडीपट्ट्यात पागाची मासेमारी करण्याला वेग आला आहे.
मुरूड नगर परिषद ने अद्ययावत मासळी मार्केट बांधलेले असतानाही काही मासळी विक्री करणारी मंडळी चक्क रस्त्यावर मासळी विक्री करून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत असतात. प्रशासनाने अनेकवेळा सांगूनही यात फारशी सुधारणा झालेली नाही. यामुळे सद्यःस्थितीत अखेर मोठी कारवाई करणे भाग पडणार आहे. सकाळी मासळी मार्केटमध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोना निर्मूलनासाठी केलेली मेहनत वाया जाऊ शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. सध्या मासळी मार्केट ते एकदरा पूल या मार्गावर गर्दीमुळे वाहनाची मोठी कोंडी होत असून, येथे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. एखाद वेळेस वाहन घुसून मोठ्या अपघाताची शक्यतादेखील दिसत आहे. सोशल डिस्टिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे स्पष्ट दिसून आले.