रावे गावात 400 लिटर गावठी दारूचे मिश्रण केले नष्ट
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रावे येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारुच्या भट्टीवर कारवाईची करण्यात आली आहे. रायगड पोलिसांकडून सदर मोहीम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. पेण तालुक्यातील रावे गावातील ठाकूरवाडी खाडी किनारी प्रॉव्हिशन रेड नुसार कारवाई करण्यात आली असून गावठी दारू तयार करण्यास लागणारे 400 लिटर मिश्रण व इतर साहित्य हस्तगत करून नष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात खाडी किनारी, जंगल भागात व इतर निर्जलस्थळी अवैध गावठी दारू भट्ट्या सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती रायगड पोलीसांना मिळाली आहे. सदर माहिती मिळताच तात्काळ हे सर्व अवैध दारू बनविण्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक पोलिस स्टेशनला दिल्या होत्या. त्यानुसार पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे व कर्मचार्यांनी रावे गावात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
पेण तालुक्यातील रावे गावातील ठाकूरवाडी खाडी किनारी प्रॉव्हिशन रेड नुसार कारवाई करण्यात आली असून गावठी दारू तयार करण्यास लागणारे 400 लिटर मिश्रण, ड्रम व इतर वस्तू हस्तगत करून नष्ट करण्यात आले आहेत.
सदर कारवाई रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशाने तसेच दादर सागरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे, पोलीस नाईक अतिष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर जाधव, पंकेश जाधव आदी पोलिसांच्या पथकाने केली आहे.