| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने बागायत क्षेत्रा समोर आधीच पाणीटंचाईचे संकट उभे असताना आता मजूर टंचाईची ही भर पडली आहे. वाढत्या रिसॉर्ट, हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायामुळे वाडीत मजुरी करणाऱ्या स्थानिक मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून दिवसाची मजुरी जास्त या कारणास्तव महिला व पुरुष मजुरांचा रिसॉर्ट, हॉटेल कडे ओढा वाढत असल्याने त्याचा परिणाम नारळ, सुपारी बागायतींवर होणार आहे.
श्रीवर्धन तालुक्यात अनेक बागायतदारांकडे एक-दोन एकरांपासून मोठ्या क्षेत्रापर्यंत नारळ-सुपारीच्या वाड्या आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाडांच्या बुंध्याशी खणून शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकणे, पाण्याचा निचरा व झाडांना पाणी मिळण्यासाठी वळी करणे, तण काढणे, झाडाझाड करणे आदी कामांना मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. मात्र, सध्या महिला तसेच पुरुष मजूर सहज उपलब्ध होत नसल्याने बागायतदारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. वाढते रिसॉर्ट, हॉटेल आणि रेस्टॉरंट यामुळे स्थानिक मजुरांना वाडीतील मजुरी पेक्षा अधिक मोबदला मिळत असल्याने त्यांचा कल पर्यटन व्यवसायाकडे वाढला आहे. परिणामी वाडीत तण काढण्यासाठी महिला मजूर, तर नारळ उतरवणे व सुपारी काढण्यासाठी पुरुष मजूर मिळणे कठीण झाले आहे. मनुष्यबळ हीच परिस्थिती कायम राहिल्यास श्रीवर्धनच्या पारंपरिक नारळ व रोठा सुपारीच्या वाड्या टिकवणे बागायतदारांसाठी भविष्यात मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे पाण्याची आधीच चिंता आहे. त्यात मजूरांची कमतरता यामुळे बागेची कामे वेळेत होणार नाहीत. याचा भविष्यात उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील बागायतदार व्यक्त करीत आहेत.
श्रीवर्धनमध्ये स्थानिक मजुरांच्या संख्येत घट
