| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 40 ते 41 अंशापर्यंत जात आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यातच उष्माघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. या सर्वावर उपाय म्हणून सब्जा आणि वाळा उपयुक्त असल्याने बाजारात मागणी वाढली आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारच्या वेळात बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. त्यातच उष्माघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेकांना मूत्रविकाराचे त्रास होऊ लागले आहेत. या सर्वांवर उपयुक्त असलेले वाळा व सब्जा यांची मागणी त्यामुळे वाढली आहे. बाजारपेठांमधील मॉल, शॉपिंग सेंटर ते अगदी छोट्याशा किराणा मालाच्या दुकानातही सब्जा आणि वाळ्याची मागणी होत आहे. वाळ्याला हिंदीमध्ये खस म्हणतात. बाजारात खस सरबतालाही मागणी वाढली आहे. सब्जाला एरव्ही फार कमी मागणी असते. फालुदा या पेयामध्ये त्याचा वापर होत असतो. बाजारात मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये सब्जाला खास करुन मागणी असते. परंतु या वर्षी थंडी लांबल्याने मार्च महिन्यात याची खरेदी झाली नाही. परंतु या महिन्यात अचानक तापमान वाढल्याने सब्जा आणि वाळ्याची मागणी वाढली आहे. सध्या सब्ज्याचा दर 400 ते 500 रुपयांच्या घरात आहे. दुकानांमध्ये मागणी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सब्जाची मागणी केलेली आहे. एक ग्लास पाण्यात 2 ते 3 चमचे सब्जा भिजत ठेवून तो वापरला जातो.
सब्जाप्रमाणेच वाळा या सुगंधी वनस्पतीची देखील मागणी वाढली आहे. वाळा म्हणजे या वनस्पतीची मूळ असते. स्वच्छ पाण्याने धुऊन वाळ्याची जुडी तयार केली जाते. वाळ्याची एक जुडी तीस रुपयांना मिळत आहे. एक जुडी आठ ते दहा वेळा वापरात येत असल्याने वाळा जुडीची देखील मागणी वाढली आहे. आयुर्वेदिक औषधांची दुकाने तसेच किराणामालाच्या दुकानांमध्ये वाळा उपलब्ध झालेला आहे. वाळ्याचे सरबत देखील 150 ते 170 रुपये प्रति लिटर प्रमाणे उपलब्ध आहे. उन्हाळ्यात वाळा सरबतालाही चांगले दिवस आले आहेत.