| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील नेरे दुंदरे विभागातून मागील दोन-तीन महिन्यामध्ये वाजे, उमरोली, धोदाणी, कोप्रोली, गाढेश्वर, सतीची वाडी, दुंदरे, रिटघर, उसरली, पाली, नेरे, मोरबे, तामसई या गावामधून गुरांच्या चोर्या झालेल्या आहेत. या गुन्ह्यामध्ये नूर मोहमद इसाक कच्ची उर्फ (पापा) (रा. कच्छी मोहला, पनवेल, वय 24वर्ष) याच्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी मनसेतर्फे दिनेश मांडवकर, विश्वास पाटील, विद्याधर चोरघे यांनी पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुरे चोरणार्या आरोपींची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासावी. नेरे-दुंदरे विभागातून त्याचे कोणी साथीदार आहेत का याचा तपास करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या गावातील गुरे चोरी झालेल्या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुभत्या गाई चोरीला गेल्यामुळे दुध व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच ऐन शेतीच्या मशागतीच्या हंगामात बैल, चोरीला गेल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोन देणार असा सवाल मनसेने विचारला आहे. तरी सदर गुरे चोरी प्रकरणातील गुन्हेगाराकडून त्यांनी केलेल्या मागील सर्व गुन्ह्याची उकल करावी व इतर गुन्ह्यातील आरोपींना मोक्का लावला अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.