| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
भरतीच्या पाण्यापासून वसाहतीचे संरक्षण व्हावे यासाठी सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या धारण तलावातील कांदळवंनाना धोका पोहचू न देता धारण तलावात साचलेला गाळ कसा काढता येईल यासाठी पालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या एजन्सीचा अहवाल येत्या दहा ते पंधरा दिवसात येण्याची शक्यता आहे. एजन्सीकडून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारे धारण तलावतील गाळ काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी घेणे पालिकेला शक्य होणार आहे. भरतीच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या करता सिडकोने तालुक्यातील वसाहतीच्या खाडी किनारी धारण तलावांची निर्मिती केली आहे. समुद्राला येणाऱ्या भरती वेळी खाडीत येणारे समुद्राच्या भरतीचे पाणी या धारण तलावात शिरत असल्याने वसाहतींचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण होत आहे.
मात्र भरतीच्या पाण्यासोबत येणारी माती आणि वसाहती मधून धारण तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा या तलावात साठत असल्याने धारण तलावांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे.धारण तलावांची कमी झालेली क्षमता वाढवण्यासाठी तलावात साठलेला गाळ उपसण्याची आवश्यकता आहे. मात्र तलावात वाढलेल्या कांदळवनामुळे शासनाच्या परवानगी शिवाय गाळ काढणे शक्य होत नसल्याने सिडको वसाहतींचे पुरापासून रक्षण करण्यासाठी धारण तलावतील गाळ काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असून,कांडल वनाला धोका न पोहचू देता तलावतील गाळ काढता यावा या करता पालिकेकडून श्री करूशी कॅन्सलटन्ट या एंजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेने नेमलेल्या या एजन्सीने तलावतील गाळ काढण्यासाठी अहवाल तयार कारण्यांचे काम शासनाने नियुक्त केलेल्या अण्णा युनिव्हर्सिटी ही जवाबदारी दिली आहे.
कामाची पाहणी
अण्णा युनिव्हर्सिटीच्या टीम मार्फत कळंबोली येथील धारण तलावाची पाहणी करण्यात आली आहे. याचा अहवाल काही दिवसात पालिकेला प्राप्त होणार असून, पालिका प्रशासनकडून हा अहवाल महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटी आणि उच्च न्यायालयत सादर केला जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी संजय कटेकर यांनी दिली आहे.
होल्डींग पॉडची पध्दत
या पॉडच्या दोन बाजुस खाडीच्या बाजुस व कळंबोली वसाहतीतुन येणारे सांडपाणी वाहुन आणणाऱ्या नाल्याला उघड बंद करता येणाऱ्या झडपा लावण्यात आल्या आहेत. वसाहतीमधील सांडपाणी नाल्यावाटे या होल्डींग पॉडमध्ये आणले जाते. ज्या वेळेत खाडीला भरती नसते त्या वेळेत या झडपा उघडुन नाल्यातील पाणी हॉल्डीग पॉडमध्ये जमा करुण ते खाडीत सोडले जाते. मात्र जेव्हा भरती येते त्या वेळेत भरतीच पाणी नाल्यावाटे शहरात घुसु नये म्हणुन नाल्याजवळील झडपा बंद करुन भरतीचे पाणी या हॉल्डीग पॉडमध्ये जमा केले जाते त्यामुळे भरतीचा ओघ आपोआप कमी होत असल्याने शहराचे भरतीच्या पाण्यापासून संरक्षण होते.
न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यास कळंबोली वसाहतीमधिल रहिवाशांना असलेला पुराचा धोका टळणार आहे. समुद्र सपाटीपासून खाली असल्याने कळंबोली वसाहतीत 2005 साली आलेल्या पुरात सर्वाधिक नुकसान झाले होते. धारण तलावात असलेल्या गाळामुळे वसाहतीत जवळपास दोन दिवस भरतीचे पाणी साठून राहिले होते.
-संजय कटेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी