| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलीस भरती महिला उमेदवारांकडून खंडणी प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या अटकपुर्व जामिनाची मुदत संपल्यावर त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दि.1 जुनपर्यंत तहकूब करण्यात आल्याने पुन्हा एकदा डॉ. माने यांना दिलासा मिळाला आहे. आपली अटक टाळण्यासाठी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेत अटकपुर्व जामीन मंजुर झाल्याने दि.25 मे पर्यंत त्यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र दि.30 मे रोजी त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी सांगितले.
रायगड पोलीस दलात भरतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होती. ही तपासणी करताना 15 महिला उमेदवारांकडून प्रत्येकी 1500 रुपयांची रक्कम जिल्हा शल्यचिकित्सकांचे लिपिक प्रदीप ढोबळ याने वसूल केले. पैसे दिले नाहीत तर वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ढोबळ याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने तडकाफडकी रजेवर गेले होते. रजेवरून परत येताच त्यांची पोलिस चौकशी करण्यात आलीत्र यावेळी त्यांना पुन्हा दि.30 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
गुरुवारी डॉ. सुहास माने यांच्या अटकपुर्व जामिनाची मुदत संपल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र न्यायालयासमोरील कामकाज जास्त असल्याने त्यांच्या जामीनअर्जावरील सुनावणी दि.1 जुनपर्यंत तहकूब करण्यात आली असल्याची माहिती ॲड प्रविण ठाकूर यांनी दिली.