अवकाळी, उन्हाचा उत्पादनावर परिणाम
| नवी मुंबई | वार्ताहर |
कोकणातील हापुस आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु दरम्यानच्या कलावधीत हवामान बदल, अवकाळी, कडक उन्हाळ्याने उत्पादनावर पाणी फेरले असून यंदा अवघे 16 टक्के ते 18 टक्के उत्पादन आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार कमी प्रमाणात हापुस दाखल होत असून 30 मे असा 15 दिवसच हापुसचा हंगाम राहील, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने यंदा हापुस उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा असताना वेळोवेळी हवामानात होणाऱ्या बदलाचा फटका आंब्याला बसला. उष्ण-दमट हवामान, वातावरण बदल, अवकाळी पावसाने हापूसच्या अपेक्षित उत्पादनाला अधिक फटका बसला आहे. जानेवारी-मार्च दरम्यान कमी प्रमाणात बाजारात हापुस दाखल होतो, तर हापुसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात असतो. मात्र यंदा हापूसच्या हंगामाचे उलट चित्र पहावयास मिळाले.
एपीएमसी बाजारात 15 दिवसांच्या कालावधीत टप्याटप्यात कोकणातील हापुस दाखल होतो. परंतु यंदा मार्चमधील अवकाळी पावसाच्या भीतीपोटी कोकणातील शेतकरी, बागयदार यांनी वेळे आधीच हापुसची तोडणी केली. त्यामुळे कमी प्रमाणात दाखल होणाऱ्या मार्च महिन्यात सर्वच विभागातुन हापुस एकावेळीच दाखल झाल्याने एपीएमसीत चार ते पाच पटीने आवक वाढली. त्यामुळे शेतातील हापुस कमी झाला असून एप्रिल-मे महिन्यात 80-90 हजार पेट्या दाखल होणारी आवक घटली. एप्रिल मध्ये 30-40 हजार पेट्या तर मे महिन्यात 20-25 हजार पेट्या दाखल झाल्या. यामध्ये अतिउष्णतेने मोठा हापुस आतून काळवंडत आहे. साधारणतः मोठ्या आकाराच्या हापुस आंब्याच्या 5 डझन पेटीत 8-10 आंबे खराब निघत आहेत. यंदा हापुसचे उत्पादन अत्यल्प असल्याने हापूसप्रेमींना त्याची चव चाखता आली नाही. हापुसचा हंगाम मे अखेर संपुष्टात येईल असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. तर उर्वरित शिल्लक 20 टक्के – 25 टक्के हापुस 10 जूनपर्यंत बाजारात उपलब्ध असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.