बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!

गोकुळ वाचविण्यासाठीची लढाई; जयंत पाटील यांचे आवाहन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून, समविचारी आघाडीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तरुण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व म्हणून बंटी उर्फ सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची निवडणूक होत असून, विरोधकांना पुन्हा उभे राहता येणार नाही, इतक्या प्रचंड मतांनी बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू महाराज शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने कोल्हापूर येथे गुरुवारी (दि. 8) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे प्रमुख विजय देवणे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सत्यजीत पाटील, राजू वागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र वेगळ्या आशेने पाहतो असे तरुण, तडफदार नेतृत्व बंटी पाटील यांच्याकडे आहे. त्यांना समविचारी आघाडी पॅनलचे नेतृत्व दिल्याबद्दल संपूर्ण कोल्हापूरकरांना धन्यवाद. स्वच्छ आणि आक्रमक, पण शांत प्रवृत्तीचे बंटी पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची निवडणूक होत आहे. छाननीपासून अर्ज माघारीच्या प्रक्रियेपर्यंतची सुरुवात चांगली झाली असून, समविचारी आघाडीला चांगला संकेत मिळाला आहे. स्वच्छ प्रतिमेचे आणि सामान्यांचे काम करणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

गोकुळ म्हणजे चुयेकर, हे वावगे नाही
शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या रूपाने आघाडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व आहे. गोकुळसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या वडिलांनी कष्टाने गोकुळ संस्था उभी केली. ते आघाडीमध्ये असल्याने आघाडीचा विजय निश्चित आहे. ‌‘गोकुळ म्हणजे चुयेकर‌’ असे बोलणे वावगे ठरणार नाही. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार असून, त्यांनी नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. गोकुळ वाचविण्यासाठी ही लढाई आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
साडेपाच लाख शेतकरी आघाडीला विजयी करतील : सतेज पाटील
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक कधी लागणार, याची उत्सुकता होती. अखेर तो दिवस उजाडला असून, अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, विकास पाटील, रामराजे कुपेकर, विद्याधर गुरबे, सत्यजीत पाटील, विश्वजीत पाटील, भिमगोंडे बोरगाडे, विश्वजीत जाधव, विशाल पाटील, सचिन घोरपडे, मोहन धुंदरे, उदय पाटील, बाबासाहेब देवकर, रणधीर मोरे हे उमेदवार रिंगणात आहेत. गोकुळची निवडणूक साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. समविचारी आघाडीने जिल्ह्यात पॅनल करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली असून, साडेपाच लाख शेतकरी आमच्या पॅनलला विजयी करतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळचा गड जिंकणार : राजू शेट्टी
गोकुळ म्हणजे कोल्हापूरचा स्वाभिमान आहे. गोकुळचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला होता. मात्र, त्यांना अद्दल घडविण्याचे काम करण्यात आले. समविचारी आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील सच्चे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये सहज मिसळणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. या निवडणुकीत बडे पैलवान असले तरी त्यांना पराभूत करून गोकुळचा गड जिंकणार आहोत, असा विश्वास शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
Exit mobile version