। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळापूर्व कामांच्या तयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून नवी मुंबईतील सर्व शासकिय प्राधिकरणे व स्वयंसेवी संस्था यांची समन्वय बैठक घेतली होती. त्या अनुषंगाने शहरातील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांना पालिका आयुक्तांनी भेट देऊन येथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यादृष्टीने विहित वेळेत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत व पावसाळा कालावधीत परस्पर संपर्क राखण्याचे निर्देशित आयुक्तांनी दिले होते. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणेबाबत त्वरित कार्यवाही सुरु करावी असेही बैठकीमध्ये आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले होते.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पालिका क्षेत्रातील 15 संभाव्य ठिकाणे असून त्यामधील रमेश मेटल कॉरी परिसराला आयुक्त नार्वेकर यांनी भेट दिली, यावेळी वरिष्ठ अधिकारी तसेच विभाग अधिकारीही उपस्थित होते. पावसाळी कालावधीपूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वच विभागातील अशा नागरिकांना सुयोग्य जागी हलविण्याचे निर्देश दिलेत. आयुक्तांनी तुर्भे एमआयडीसी परिसरातील मेढकर कॉरी भागात सुरु असलेल्या नालेसफाई कामाचीही पाहणी केली. काही क्षेत्रात नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात झोपड्या असल्यास त्याही हटवून तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांमार्फत देण्यात आले. नवी मुंबई शहरात तुर्भे व नेरूळ दगडखाणी भागात पावसाळ्यात अनेक अडचणी येतात त्या दृष्टीने सर्वच विभागात योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.