29000 फुटावर ऑक्सिजन बंद पडला अन काळजाचा ठोका चुकला
| नेरळ | प्रतिनिधी |
दीड महिन्याच्या यशस्वी मोहिमेनंतर एव्हरेस्टवीर संतोष दगडे हे दि. 22 रोजी रात्री कर्जत येथे पोहचले. रात्री कर्जत फाटा येथे शेकडो कर्जतकर एव्हरेस्टवीर दगडे यांच्या स्वागतासाठी जमा होते. दरम्यान, 29000फुटावर असताना माऊंट एव्हरेस्टच्या शिखराच्या अगदी जवळ असताना ऑक्सिजन पुरवठा बंद पडला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी मी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांची शेवटची आठवण काढली होती, असा चित्तथरार अनुभव संतोष दगडे यांनी सांगितलं आणि सर्वांच्या अंगावर काटा आला.
जगातील 400 गिर्यारोहक यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेची सुरुवात केली. त्यात भारत देशातील 15 गिर्यारोहक होते आणि या सर्व गिर्यारोहक यांच्यातील पहिली सात जणांची तुकडी यांनी दि. 17 रोजी सकाळी माऊंट एव्हरेस्ट सर केले. ही मोहीम यशस्वी करणारे महाराष्ट्र राज्यातील गिर्यारोहक संतोष दगडे हे दि. 22 रोजी रात्री मुंबईत पोहचले आणि आपल्या घरी कर्जत येथे आले. त्यावेळी कर्जत चार फाटा येथे शेकडो तरुण हे दगडे यांचे अभिनंदन करण्यासाठी रात्री उपस्थित होते. कर्जत येथील संतोष दगडे, ठाणे-डोंबिवली आणि बदलापूर येथील संदीप मोकाशी, हेमंत जाधव आणि धनाजी जाधव या चौघांची एक टीम होती आणि या ग्रुप मधील सर्व जण सुखरूप घरी पोहचले आहेत. मात्र हवामान खराब असल्याने माऊंट एव्हरेस्टवर केवळ एक तुकडी सोडण्यात आली होती, त्या तुकडीत संतोष दगडे होते आणि त्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले, पण त्यांच्यासोबत असलेले शेरपा मिंगमा कर्मा यांनी या मोहिमेत साथ मिळाली.
कर्जत चार फाटा येथून असंख्य तरुण हे एव्हरेस्टवीर संतोष दगडे यांच्यासह त्यांच्या घरी पोहचले. त्यावेळी आपल्या कुटुंबासह गप्पा मारताना माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील अनुभव कथन केले. हवामान बदलामुळे बेस कॅम्प चार येथे ऑक्सिजनचा साठा अपुरा पडत होता आणि त्यामुळे बेस कॅम्प चार ते माऊंट एव्हरेस्ट या टप्प्यात केवळ सात गिर्यारोहक आणि 11 शेर्पा यांना अंतिम चढाईसाठी पाठविण्यात आले. आधीच ऑक्सिजन साठा संपण्याच्या वाटेवर असताना दि.17 रोजी रात्री माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या अगदी जवळ संतोष दगडे यांच्याकडील ऑक्सिजन सिलेंडर संपले होते. त्यावेळी अंतिम चढाईत सात गिर्यारोहक आणि शेर्पा हे सोबत चालत नव्हते. त्याचे कारण अंतिम टापूत असताना एकेरी वाट असल्याने सर्व काही अंतर ठेवून चालत होते. आपल्या त्या प्रवासात सात ते आठ जण ऑक्सिजन संपल्याने अंतिम घटिका मोजत तडफडत पडलेले संतोष दगडे यांनी पाहिले होते. जमिनीपासून 29000 फुटावर असताना जवळपास 45 मिनिटे संतोष दगडे हे पडून होते. त्यावेळी त्यांना देखील आपल्याला आता कोणी वाचवू शकत नाही असे दगडे यांना वाटून गेले होते. त्यावेळी संतोष दगडे यांनी आपल्या सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांची आठवण केली. त्यांना सर्वांना डोळ्यासमोर ठेवून संतोष दगडे यांची मोहीम तेथेच संपण्याची शक्यता असताना पहिल्या चढाई मधील 11 शेर्पा यांच्यापैकी एका शेरपाने आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर संतोष दगडे यांना दिले आणि त्या ऑक्सिजनचे सहायाने संतोष दगडे हे माऊंट एव्हरेस्ट सर करू शकले.
बेस कॅम्प दोन येथे परत आल्यावर संतोष दगडे आपल्या सोबत मोहिमेवर असलेले मित्र हेमंत जाधव, धनाजी जाधव, संदीप मोकाशी यांना मिठी मारून आपण कसे मरणाच्या दारातून बाहेर आलो आहोत याची माहिती दिल्यावर त्यांचे डोळे देखील पाणावले होते, असे दगडे यांनी यावेळी आपल अनुभव कथन करताना सांगितले. तर जगातील अनेक सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या टीम मधील गिर्यारोहक यांना माऊंट एव्हरेस्टचे वाटेवर पडलेले पाहून आपण चांगले पुण्यांचे काम केले आणि म्हणून 1 एप्रिल रोजी एकत्र निघालो होतो आणि पुन्हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकत्र पोहचलो याचा सर्वात जास्त आनंद आहे, असे एव्हरेस्टवीर संतोष दगडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
एव्हरेस्टवर तिरंग्यासह छत्रपती शिवाजी महाराज…
दगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापलेला झेंडा आणि त्याच्या वरच्या भागात भारताचा तिरंगा असा झेंडा एकत्र असलेले साहित्य सोबत नेले होते आणि तो झेंडा मानाने 8848 मीटर उंचीवरील सर माऊंट एव्हरेस्ट शिखरावर रोवला आणि त्या झेंड्याला अभिवादन केले.