| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने भात व नागली ही पिके घेतली जातात. परंतु बरेचशे शेतकरी अजून ही पारंपारिक पद्धतीनेच शेती करतात, त्यामुळे भात व नाचणी पिकाचे उत्पादन कमी होत चालले आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा उपद्रव, मजुरांची कमतरता या व अशा अनेक कारणांमुळे शेती क्षेत्र झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. या परस्थितीमध्ये बदल घडावा व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून भात व नाचणी पिकांच्या शेती शाळा घेण्यात येत आहे. या शेती शाळांच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांही भात व नाचणी पिकांचे तज्ञ बनवणे हे प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमास हरीचंद्र पाटील, कृषी पर्यवेक्षक सचिन जाधव, कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे, अनिकेत पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशी असेल शेती शाळा
कृषी विभाग जे तंत्रज्ञान देईल ते राबविण्याची क्षमता असणार्या 25 शेतकऱ्याची या शेतीशाळेसाठी निवड केली जाते. तसेच पिकाच्या पूर्वमशगती पासून ते कापणीपर्यंत शेती शाळेच्या सहा वर्गांचे आयोजन करण्यात येते. या वर्गांमध्ये प्रामुख्याने शेतावरच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात येते जेणे करून परिणामकारकरीत्या माहिती मिळते .