| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात मागील वर्षभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती, जिरायती पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये 557 शेतकऱ्यांचे 24 लाख 78 हजार 612 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेचा छदामही प्राप्त झाला नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
उरण तालुक्यात भातपीक 24.11 हेक्टरवर घेतले जाते. तर आंबा, काजू, शेवगा आदी फळबागांचे बागायती पिके 74.29 हेक्टर शेतीत घेतली जातात. उरण तालुक्याचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे आदी नैसर्गिक आपत्तींमध्ये येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 248 शेतकऱ्यांचे 50.22 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे सहा लाख 82 हजार 992 रुपयांचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 30 शेतकऱ्यांचे 9.27 हेक्टर शेतातील पिकांचे एक लाख 25 हजार 145 रुपयांचे नुकसान झाले. तर मार्च 2023 मध्ये 189 शेतकऱ्यांचे हेक्टरचे 31.45 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नऊ लाख 975 रुपयांचे असे एकूण 17 लाख 9 हजार 112 रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मार्चनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसामुळे 90 बागायतदारांचे 7 लाख 69 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. शासनाच्या वेब पोर्टलवर माहिती टाकण्यात आली आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल. आमच्याकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
– उद्धव कदम, तहसीलदार, उरण
पावसाळा जवळ आला असून, आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भात, बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासणार आहे. मात्र, शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे खरीपाची नवीन पेरणी कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून आहे.
– कृष्णा म्हात्रे, शेतकरी