सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी; शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

कोकणासह रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने त्वरित सरसकट पंचनाने करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी. असे धोरण राज्य शासनाने घेतले पाहिजे, अशी मागणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली.

तोंडाशी आलेला घास काढून घेण्याचे काम निसर्गाने केलेले आहे. त्या दृष्टीकोणातून पंचनाम्याकरिता विलंब न लावता सरसकट शासनाने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेकाप तर्फे करण्यात येत आहे. सर्वत्र भयानक परिस्थिति उद्भवली आहे. चांगले पीक यावेळी आले होते. परंतु, चांगले आलेले पीक आणि कापलेले पीक हे पाण्याखाली गेले असून पीक भिजले आहे. सर्वच ठिकाणी तलाठी आणि सर्कल यांना शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणे शक्य होत नाही, म्हणून सरकारकडून सर्व शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले पाहिजे. तसा रिपोर्ट राज्य शासनाला त्यांनी दिला पाहिजे, अशी शेकापच्यावतीने जयंत पाटील यांनी मागणी केली आहे.

तसेच, अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रासह कोकण, रायगडमधील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्वांना सरसकट आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही शेकापची आग्रही भूमिका आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 29) सकाळी शेतकरी भवन अलिबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version