| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करुन ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यांचा वापर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या दाव्यात करणाऱ्या व या आधारे मिळकत आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारा जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाडचे तलाठी अजित बंकट धाबेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन त्यानुसार या बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारा जणांनी 4187 आणि 4250 या क्रमांकाचे बनावट फेरफार उतारे तयार करुन ही मिळकत त्यांच्या नावे होण्यासाठी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला होता. हि कागदपत्रे बनावट असतानाही ती खरी आहेत हे भासवून उपविभागीय अधिकारी यांची फसवणूक केली जात होती. हा प्रकार 14 फेब्रुवारी 2020 ते 14 मार्च 2023 या कालावधीत घडला.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केलेल्या चौकशीमध्ये हे फेरफार बनावट असल्याचे आढळून आल्याने व कार्यालयाची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने तलाठी अजित बंकट धाबेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी या बारा जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे अधिक तपास करत आहेत.