ढवरपाडा, नवेदर बेलीमध्ये योजनेचा बोजवारा;ठेकेदाराकडून होतेय फसवणूक
| अलिबाग | प्रतिनिधी |
हर घर जलच्या नावाखाली जलजीवन योजनेमार्फत घरापर्यंत पाणी पोहचेल, अशी अशा जिल्ह्यातील नागरिकांना होती. परंतू आजही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात ढवरपाडा, नवेदर बेली येथे अन्य जागा उपलब्ध असतानाही खाजण जमीनीत खोदकाम करून पाईप लाईन टाकण्याचा प्रताप ठेकेदार करीत आहे. त्यामुळे भविष्यात पाईपलाईन लिकेज झाल्यास खारे पाणी पिण्याची वेळ येणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. परिणामी, ढवरपाडा, नवेदर बेलीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत वितरित केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाणार असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील ढवर ग्रामपंचायत हद्दीतील नवेदर बेली येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबिण्यात आली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवेदर बेलीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम केले जात आहे. पाईपलाईन टाकण्यापासून पाण्याची टाकी उभारणीपर्यंतची कामे केली जात आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नरेंद्र राऊत यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
जलजीवन योजनेसाठी उभारण्यात येणारी साठवण टाकी, खाडीमध्ये बांधण्याचे नियोजन केले आहे. त्याठिकाणी खड्डा तयार केला आहे. मात्र खाऱ्या पाण्याचा धोका यातून निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त करीत ही खाजण जमीन साठवण टाकीसाठी योग्य नसल्याचे अनेक वेळा ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिले. मात्र तरीही ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले.
साठवण टाकीसाठी पर्यायी जागा असताना त्याठिकाणी साठवण टाकी बांधण्यास ठेकेदार उदासीन ठरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या योजनेसाठी बसविण्यात येणारे पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नरेंद्र राऊत यांनी केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
या समस्यांबाबत सखोल चौकशी करून ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 प्रमाणे कारवाई करून सरपंच यांना कमी करण्याची कार्यवाही करावी. तसेच गावातील लोकांना चांगली पाईपलाईन देऊन स्वच्छ पाणी मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जलजीवन योजनेअंतर्गत नवेदर बेली येथे सुरु असलेल्या कामाबाबत उपअभियंता यांना पाहणीसाठी सुचना करण्यात येणार आहे. त्या पाहणीनंतर कार्यवाही केली जाईल.
संजय वेगुर्लेकर – मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा
जलजीवन योजनेअंतर्गत नवेदर बेलीमध्ये काम सुरु आहे. साठवण टाकीचे काम खारटात केले जात आहे. त्याचा धोका असल्याचे ठेकेदार व सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र त्यांनी दुर्लक्ष करून मनमानी कारभार करीत आहेत. पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम इस्टीमेंट नुसार केले जात नाही. पाईपदेखील चांगल्या दर्जाचे नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कारण गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
नरेंद्र राऊत, तक्रारदार