हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्मार्ट मीटरच्या नावाखाली मोठा स्कॅम सुरु आहे. सर्वसामान्यांच्या घरात घूसून त्यांच्या तिजोरीतून पैसे काढण्याचा डाव सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. जोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष सर्वसामान्यांच्या सोबत आहे, तोपर्यंत कोणीही हतबल होऊ नका. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा आपण स्मार्ट मीटर विरोधात देणार आहोत. त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू आहे. तालुका स्तरावर बैठका घेऊन स्मार्ट मीटरच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नारायण नागू पाटील यांनी त्यावेळी खोतांविरोधात लढा देऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. आता तोच वारसा घेत या कार्पोरेट खोतांना घालविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या खोतांना घालविल्याशिवाय शेकाप गप्प बसणार नाही, अशा इशारा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. तरुणवर्गदेखील या सरकारच्या भुमिकेविरोधात आक्रमक झाला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. परंतु, जिल्ह्यासह राज्यात सुरु असलेल्या सरकारी हुकूमशाही धोरणांविरोधात तीव्र संताप जनतेमध्ये निर्माण झाला आहे. या सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघण्यास वेळ नाही. परंतु, टॉम ॲन्ड जेरीसारखे खोटे राजकारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशातील हूकुमशाही घालविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात होणाऱ्या आंदोलनात लाखोच्या संख्येने सर्वसामान्यांनी सहभागी होऊन सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

Exit mobile version