तालुक्यातील 15 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
शासनाच्या वेगवेगळ्या योजना मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना चपला झिजवाव्या लागत आहेत. मात्र नागरिकांची ही वणवण आता थांबणार आहे. शासन आपल्या दारी योजने अंतर्गत अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमातून शासनाच्या सर्व योजना आता घरांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.
शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनामार्फत सुरु केला जाणार आहे. या अभियानांतर्गत अलिबाग तालुक्याला 15 हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा याकरीता अलिबाग तालुक्यातील अलिबाग, नागाव, चौल, रामराज, चरी, पोयनाड, कामार्ले, सारळ आणि किहीम या मंडळामध्ये जन कल्याण कक्ष सुरु केले जाणार आहेत. या कक्षामध्ये संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, महा-ई-सेवा केंद्र चालक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व अन्य यंत्रणा कार्यरत असणार आहे. तालुक्यातील मंडळ स्तरावर नऊ असलेल्या जनकल्याण कक्षावर नियंत्रण तालुका स्तरावरील जनकल्याण कक्षाचे राहणार आहे. जन कल्याण कक्षामार्फत शासनाच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याबरोबरच वेगवेगळे दाखले घरच्या घरी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दहावी, बारावीच्या निकालानंतर अनेक जण उच्च शिक्षणासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी धावाधाव करणार आहेत. मात्र जनकल्याण कक्षामार्फत ही धावाधाव थांबणार आहे. घरच्या घरीच विद्यार्थ्यांना दाखले मिळणार आहेत. मंडळ स्तरावर मंडळ अधिकारी यांची जनकल्याण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार जनकल्याण कक्ष म्हणून भुुमिका बजावणार आहेत. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत वय अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, तात्पुरता रहिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, अल्पभूधारक दाखला,भूमिहीन दाखला, शेतकरी दाखला, डोंगरी दाखला, सातबारा प्रमाणित प्रत, प्रकल्पग्रस्त दाखला, नव मतदार नोंदणी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि शिधापत्रिका या सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
जनकल्याण कक्ष मदतीला
शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्यावर आता सर्वांची दाखले काढण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.ऑनलाईन पध्दतीने ही प्रक्रीया आहेत. ही प्रक्रीया सोयीस्कर असली, तरीही डोकेदुखी ठरत आहे. इंटरनेटची समस्या सतत भेडसावत असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्याां वेळेवर दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होतात. ही समस्या सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत शासनाच्या योजा व दाखले वेळेवर देण्यासाठी मंडळ व तालुका स्तरावर जनकल्याण कक्ष सुरु केले जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना जवळच्या जवळच दाखले उपलब्ध होणार आहे. योजनांची माहितीदेखील गावातूनच मिळणार आहे. योजना व दाखल्यांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण कक्ष धावून येण्याची शक्यता आहे.
शासनाच्या संबंधित तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांचा सहभाग व मार्गदर्शन असणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विक्रम पाटील, तहसीलदार, अलिबाग