| उरण | वार्ताहर |
एकलव्य करियर कॅडमी उरण व विजय विकास सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी टाऊनशीप, उरण येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक एकलव्य अकॅडमीचे संस्थापक राम चौहान यांनी केले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पोलिस भरतीसंदर्भात मार्गदर्शन करतेवेळी थेअरी आणि मैदानी तयारी तसेच अभ्यासक्रमातील अनेक बारकावे, पद्धती, अंकगणितातील टॅक्टटिज समजावून सांगितल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याकरिता नक्कीच मदत झाली.
उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी मुलांना आपल्या आईवडिलांच्या कृपाछत्राखाली संपूर्ण मिळत असलेले सहकार्य विचारात घेऊन फक्त दोन महिने उद्दिष्ट प्राप्तीसाठी असताना सातत्यपूर्ण प्रचंड मेहनत घेतली तर पुढील 40 ते 50 वर्षे आपले जीवन सुरक्षित कसे होईल हे सांगत असताना जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गरुड झेप स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेबाबत तसेच ऑनलाईन अॅपबाबतची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, विकास भोईर उपस्थित होते.