शासनाचे निर्णय ठरताहेत जीवघेणे; आदिवासींकडून हातगाडी ओढण्याचे काम
| नेरळ | वार्ताहर |
माथेरानमध्ये वाहनानं बंदी असल्याने येथील स्थानिकांना घरगुती साहित्य आणि अन्य साहित्याची वाहतूक करताच आर्थिक समस्या सहअनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात साहित्याची ने-आण हि हातगाडीवरून करावी लागत असून किमान तीन ते चार किलोमीटर हे अंतर हातगाडी ओढणारे यांना अवजड साहित्य सोबत घेऊन ओढावी लागत आहे. दरम्यान, आता शासनाने सामानाची ने-आण करण्यासाठी पर्यावरणपूरक ई-टेम्पो यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या माथेरानमध्ये वाहतुकीसाठी वर्षानुवर्षे आदिवासी बांधव हातगाडी ओढत असतात. 8 मे 1974 च्या दरम्यान तत्कालीन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्या काळात रेल्वे कामगारांचा संप झाला होता. त्यावेळी माथेरानची दळणवळण व्यवस्था बंद झाल्याने माथेरानकरांनी श्रमदान करून नेरळ माथेरान रस्ता तयार केला. त्यानंतर 1978 च्या दशकात नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा सुरु झाली. 1985 साली माल वाहतुकीकरीता टेम्पो सुरू झाले. परंतु, गरजेनुसार जो तो व्यापारी आपली मालवाहतूक दस्तुरी नाक्यापासून पुढे माथेरानपर्यंत डोक्यावर घेऊन करु लागला. 1990 च्या दशकात रेल्वेने मालगाडी बंद करून रेल्वेच्या मालवाहतुकीला ब्रेक लागला आहे. तेव्हापासून माथेरान मधील बांधकाम साहित्य पासून हॉटेल आणि घरगुती वापराच्या वस्तूंची माथेरान शहरात ने-आण ही हातगाडी मधून केली जात आहे. ती हातगाडी माथेरानमध्ये पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अनेक भागातून येणारे लोक करीत असतात.
प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ ही माथेरानची प्रमुख ओळख आहे. दस्तुरी नाक्यापासून पुढे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असल्याने दस्तुरी नाक्यापुढील वाहतूक मनुष्यबळ किंवा हातगाडीच्या साहाय्याने केली जाते. परंतु, ही प्रथा अमानवीय असून देशाला अशोभनीय आहे. तसेच नाईलाज म्हणून सेवा देणारे कामगार हातगाडी ओढण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. त्यात मागील काही वर्षात हातगाडी ओढणारे यांची संख्या रोडावली आहे. त्याचे कारण नवीन पिढी हे अशोभनीय काम करायला कचरत आहे. त्यामुळे भविष्यात जर माथेरानला हातगाडी ओढणारे कामगार मिळाले नाहीत तर गंभीर परिस्थिती उद्भवून दळणवळण बंद पडू शकते. एकीकडे शासन माथेरान पर्यटनस्थळाचा विकास होण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. परंतु, दस्तुरी नाक्यापुढे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने या विकासाला देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्यांवर येथील राज्यकर्तांनी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरानचा विकास साधून वाहतुकीच्या समस्यांवर शासनाने तोडगा काढून मध्यरात्री पर्यावरण पूरक ई-टेम्पो करीता परवानगी द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तसे झाल्यास माथेरानची मालवाहतूक समस्या सुटून स्थानिकांना जीवनावश्यक वस्तु स्वस्त दरात आपल्या घरपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. माथेरानकरांच्या या मागणीवर सुप्रिम कोर्टाने विचार करण्याची गरज स्थानिक रहिवाशी दिगंबर चंदने यांनी केली आहे.