समाजात अजूनही माणूसकी जिवंत…क्वारंटाईन कुटुंबाची भात लावणी ग्रामस्थांनी केली पूर्ण

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोनामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. त्यात कोरोनाबाबत अनेक समज गैरसमज यामुळे माणूस माणसापासून दूर होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या उलट कोकणातील देवरूख-पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. या वाडीतील एक कुटुंब गेले काही दिवसांपासून क्वारंटाईन आहे. त्यामुळे त्यांची शेतीची कामे रखडली होती. वाडीतील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येत त्यांचे रखडलेले भात लावण्याचे काम पूर्ण करून दिले आहे.

कोरोना महामारीमुळे मनुष्य शारीरिक व मानसिक दृष्ट्या अस्थिर झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये कोरोना बाबत भीती, तसेच अनेक समज-गैरसमज आहेत. याचा परिणाम म्हणजे आज माणूस माणसापासून दूर होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संकट काळात एका हाकेला धावणारा माणूस, कोरोना काळात माणुसकी विसरू लागला आहे. परंतू याला अपवाद ठरली आहे ती कोकणातील देवरूख-पर्शरामवाडी.देवरूख- पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवून एकीचे व माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या वाडीतील एक कुटुंब गेले काही दिवस क्वारंटाईन आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या भात लावणीचे काम रखडले होते. या कुटुंबावर आलेले संकट ओळखून एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत त्या कुटुंबाची भात लावणी पूर्ण केली आहे.

Exit mobile version