रत्नागिरी दौऱ्यासाठी एसटीच्या शेकडो बसेस
| अलिबाग | भारत रांजणकर |
मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी एसटीच्या शेकडो बसेस मागवण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. कोकणात सुट्टीसाठी आलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. अशावेळी एसटी बसेस मुख्यमंत्री दौऱ्यासाठी वापरल्या गेल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. कोकणातील बस स्थानकांवर प्रवाशांची झुंबड उडाली होती. रायगड विभागातून 50 बसेस गेल्या होत्या तर एकट्या दापोली आगारातून 47 एसटी बसेस मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले होते. परीक्षा संपून शाळेला सुट्टी पडली असतांना ऐन सुट्टीच्या कालावधीतच रायगड जिल्ह्यातील तीन डेपो मधील 50 गाड्या सिल्वासाला पाठविण्यात आल्याने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने लालपरीने प्रवास करणार्या प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलवासा येथील दौऱ्यासाठी रायगड विभागातून 70 एसटी बस पाठविण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने रायगड जिल्ह्यासह कोकणातून संताप व्यक्त केला जात आहे.
रायगड विभागातील महाड आगारामधील 20, श्रीवर्धन आगारातून 15, तर माणगाव आगाराच्या 15 गाडया रत्नागिरीला पाठवण्यात आल्याने महाड, श्रीवर्धन तसेच माणगाव आगारातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गावांतील सुमारे 30 ते 35 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रवाशांना मात्र याचा फटका बसला आहे. सुट्टी संपल्याने कोकाणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरण्यामान्यांचे एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने हाल होत आहेत. एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने खाजगी वाहतूकदारांनी मात्र प्रवाशांची आर्थिक लूट करायला सुरुवात केली आहे.