| चेन्नई | वृत्तसंस्था |
गेल्या मंगळवारी झालेल्या सामन्यातील पराभवाची सव्याज परतफेड मुंबई इंडियन्सने केली. लखनौचा 81 धावांनी दणदणीत पराभव करून आयपीएलच्या क्वॉलिफायर-2 सामन्यात धडक मारली. आकाश मधवालने अवघ्या 5 धावांत 5 विकेट अशी सनसनाटी कामगिरी केली. मुंबई संघाने लखनौविरुद्ध विजय मिळविला असला तरी अद्यापही त्यांचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झालेला नाही.शुक्रवारी गुजरात विरुद्धच्या सामन्यात जर मुंबई जिंकली तर त्यांचा अंतिम फेरीत प्रवेश होणार आहे.त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत.
लखनौविरुद्ध अगोदर फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररणातही चपळता दाखवणाऱ्या मुंबईचा सामना शुक्रवारी गुजरातविरुद्ध होणार आहे.आक्रमक धावा करणे सोपे नसलेल्या खेळपट्टीवर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 182 अशी भक्कम धावसंख्या उभारली त्यानंतर लखनौला 16.3 षटकांत 101 धावांत गुंडाळले.
गेल्या काही सामन्यात मुंबईसाठी सर्वात महागडा ठरत असलेल्या जॉर्डनने आज कमाल केली त्याने लखनौचा सलामीवीर मायर्सला बाद केले त्याअगोदर मधवालने प्रेरक मंडकला माघारी धाडले होते. याच मधवालने लागोपाठ दोन चेंडूंवर आयुष बदोनी आणि धोकादायक निकोलर पुरन यांच्या विकेट काढून मुंबईच्या विजयाचा मार्ग खुला केला. ही सर्व घडामोड एका बाजूने घडत असताना लखनौचे मार्कस स्टॉयनिस, कृष्णाप्रा गौतम आणि दीपक हुडा हे तीन फलंदाज धावचीत झाले. तेथेच त्यांचा पराभव निश्चित झाला.
रोहित आणि इशान हे मुंबईचे सलामीवीर आक्रमक शैलीचे असल्यामुळे लखनौ कर्णधार कृणाल पंड्याने स्वतःसह फिरकी आक्रमक सुरू केले, परंतु पहिल्या षटकांत सावध पवित्रा घेतल्यानंतर या दोघांनी हल्ला चढवत 30 धावांची सलामी दिली. मात्र यश ठाकूर आणि नवीन उल हक या वेगवान गोलंदाजांनी रोहित आणि इशान यांना पाठोपाठ बाद केले.
गेल्या सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन आज त्याच मूडमध्ये हल्लाबोल करत होता. दुसऱ्या बाजुला सूर्यकुमारही तळपण्याच्या मार्गावर होता पण नवीन उल हकने एकाच षटकात या दोघांनी गती कमी करीत बाद केले. मुंबईच्या वेगवान वाटचालीला मोठा ब्रेक लागला. तिलक वर्माने दोन खणखणीत षटकार मारून दडपण बाजूला केले त्याचवेळी टीम डेव्हिडही फॉर्मात येत होता, पण कंबरेच्या वर नोबॉल ठरू शकलेल्या चेंडूवर तो बाद झाला. मुंबईची धावसंख्या मर्यादित रहाण्याची चिन्हे दिसत असताना वधेराने अखेरच्या षटकात 14 धावा फटकावल्या. त्याने एकूण 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला 182 धावांपर्यंत मजल मारता आली.