वेळ पडली तर लाखो कार्यकर्ते उतरवा; रोहित पवारांची शेकापला हाक

| पुणे | प्रमोद जाधव |

शेतकरी कामगार पक्ष हा आक्रमक पक्ष असून त्याने अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत. याच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी पुण्यात आल्या आहेत. वेळ पडली तर लाखो कार्यकर्ते घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहण्याची ताकद शेकापमध्ये आहे, असे गौरवोद्गार रोहित पवार यांनी काढले. एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन पुण्यात सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील बुधवारी (दि. 7) सायंकाळी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यावेळी रोहित पवार बोलत होते.

यावेळी रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे लढवय्ये नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा पाटील पक्षाचे काम करीत आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या पुण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडली तर शेकापचे लाखो कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पारदर्शक प्रशासनाच्या मागणीसाठी त्यांचा सत्याग्रह सुरू आहे. मात्र, अद्याप सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडली. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावण्याऐवजी सरकारने आंदोलनस्थळीच येऊन त्यांच्याशी चर्चा करावी. सरकारने याच ठिकाणी निर्णय घ्यावा. अन्याय झाला तर गप्प बसणार नाही. आता आवाज वाढवण्याची वेळ आली आहे.विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढणार, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

मागण्यांवर दृष्टीक्षेप
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा.
70 हजार जागांची मेगा भरती लगेच लागू करावी.
विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच प्रतिमेच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक करावी.
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावे.
विविध परीक्षांच्या चौकशी संदर्भात नेमलेल्या एसआयटीने पक्षपातीपणे चौकशी करावी.
राजस्थान सरकारच्या धर्तीवर शंभर रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घ्याव्यात

राजीनामा होणे गरजेचे आहे. मेगा भरती झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने याची दखल घेणे आवश्यक आहे.

प्रदिप शेंडगे,
विद्यार्थी

अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. अध्यक्षांनी नैतिकतेने राजीनामा देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्रांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेणे आवश्यक आहे. हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. पारदर्शक कारभारासाठी आम्ही आंदोलन पुकारले आहे.

विशाल जाधव,
विद्यार्थी

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी दबाव तंत्र वापरले जाणार आहे. भाजप प्रणित सरकारकडून हे काम केले जाणार आहे. स्कॉलरशीपसाठी यांच्याकडे निधी नाही. मात्र अन्य कामांवर उधळपट्टी चालू आहे. घोळ करणारे व पेपर फुटी करणारे अधिकाऱ्यांंचा राजीनामा झाला पाहिजे. प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. तो विचारल्या शिवाय गप्प बसणार नाही. भीमानवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे ही आमची भुमिका आहे.

साम्या कोरडे,
अध्यक्ष, शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटना
Exit mobile version