वडके विद्यालयाची दमदार कामगिरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

नुकतेच एच.ओ.सी. येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चोंढी-किहीम येथील श्री. स.म. वडके महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यावेळी त्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या स्पर्धेतील 17 वर्षांखालील गटात 5000 मीटर चालण्यात कृतिक बांद्रे याने द्वितीय तर, चैतन्य घरत याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, 19 वर्षांखालील गटात भालाफेकीत ईश्वरी पिसाळ द्वितीय क्रमांक, लांब उडीत नीती ठाकूर तृतीय, 3000 मीटर चालण्यात गौसिया किरकिरे तृतीय, 110 मीटर हर्डल्समध्ये प्रथमेश भगत प्रथम, 5000 मीटर चालण्यात मोहित बोबटकर तृतीय, 100 आणि 400 मीटर हर्डल्समध्ये मैथिली मसुरकर हिनू द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये नियती पवार, देविका पवार, कस्तुरी पवार व खुशी नाईक या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये नीती ठाकूर, प्रिया चिंबुलकर, मैथिली मसुरकर व भाविका राऊत या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, मुख्याध्यापिका सुवेगा पाटील, उपमुख्याध्यापिका नम्रता म्हात्रे, स्वागता पाटील, नाशिक पेढवी, बालघरे, जयश्री राठोड, क्रीडाशिक्षक संदेश गावंड, क्रीडाशिक्षिका अमिता वाघे आणि विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी या यशस्वी खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version