आरोपीला अटक करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
खांडपे येथील आदिवासी कातकरी समाजाच्या व्यक्तीला शिवीगाळ करून त्याच्यावर पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्ह्यातील आरोपीला कर्जत उपअधीक्षक कार्यालयाने अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे संबंधित गुन्ह्यातील आरोपीला अटक करावी आणि आदिवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे. या मागणीसाठी 2 जून रोजी कर्जत तालुका आदिवासी संघटना यांच्याकडून आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
खांडपे येथील कृष्णा तुळाजी पवार यांनी शेतामध्ये काम करताना आपल्यावर पनवेल येथील रहिवाशी आणि खांडपे येथे फार्म हाऊस असलेले अशोक राजाराम गायकर यांनी पिस्तूल रोखून आणि शिवीगाळ करीत जीव ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अधिनियम खाली गुन्हा दाखला झाला होता. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी आरोपीला अटक करण्यात आली नाही. याबद्दल कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटना यांच्याकडून कर्जत उपअधीक्षक कार्यालयात मोर्चा काढला जाणार आहे.
त्याच भागातील आदिवासी कातकरी समाजाच्या आदिम जमातीच्या मजुरी करणाऱ्या व्यक्तीवर पिस्तूल रोखून धरल्याने एक महिला धावत असताना त्या खाली जमिनीवर पडल्या. त्यावेळी तेथे असलेले अशोक राजाराम गायकर यांनी त्या महिलेच्या हाताला धरून तिला ओढत त्यांच्या फार्महाउस मध्ये नेत असताना त्या महिलेने आरडाओरड करून निसटून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. मात्र 15 मे रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात सदर आदिवासी कातकरी समाजाच्या महिलेचे जबाब कर्जत पोलिसांनी घेवून देखील गुन्हा दाखल करताना त्यांची माहिती कृष्ण पवार यांच्या ॲट्रासीि ॲक्टचे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या महिलेचा कर्जत पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा आणि आठ दिवसात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटना 2 जून रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहे. तालुका आदिवासी संघटनेने आक्रोश मोर्चाचे निवेदन कर्जत पोलिसांना दिले आहे. त्या निवेदनात संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत शीद यांची सही आहे.