| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली वसाहतीला असलेला पुराचा धोका पाहता वसाहती अंतर्गत असलेल्या नाल्यांची पावसाळा पूर्व सफाई योग्य रीतीने होणे अपेक्षित आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 चे शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी गुरुवारी (दि.25) पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वसाहतीत सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या वेळी वसाहती मधील सेक्टर 1 पासुन सिंग सिटी रुग्णालया जवळ असलेल्या होल्डिंग पाँडची देखील पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात विशेषत्वाने मागील वर्षी पाणी साचलेली ठिकाणे व त्या अनुषंगाने महापालिकेने या पावसाळ्यापूर्वी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करुन ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. गटारे व नालेसफाई कामांचे पूर्वनियोजन करण्यात आले असल्यामुळे ही कामे योग्य वेळेत पूर्ण होतील व पावसाळी कालावधीत कळंबोलीकरांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा माजी नगरसेवक रविंद्र भगत यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. तसेच, काही कालावधीनंतर पावसाळ्यापूर्वीच आणखी एकवार सर्व प्रभागातील तपशीलवार आढावा घेणारा पाहणी दौरा करणार असल्याचे नगरसेवक भगत यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिका शहर अभियंता संजय कटेकर,अधिकारी,तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.