| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
उन्हाळी पर्यटन हंगामातील शेवटचा सप्ताह सुरू असून, हजारो लोक दरदिवशी रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर दाखल होत आहेत. आज रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांचा महापूर मुरुड किनारी पाहावयास मिळाला. त्यातच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी संख्यादेखील मोठी होती. दिघी, खोरा बंदर, राजपुरी जेट्टीमार्गे लाँच व बोटीतून हजारो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले, परंतु किल्ल्यात पर्यटकांची संख्या एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी होऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने काही काळासाठी किल्ल्यात जाण्यास बंदी केली. त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच शिडाच्या बोटीत दोन तास अडकून पडले. लहान मुलांचादेखील त्यात समावेश होता. कडक उन्हामुळे पर्यटकांना याचा खूप त्रास झाला. अनेकांना प्रत्यक्षात किल्ला पाहता आला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
खरं तर, पर्यटकांसाठी किल्ला पाहण्याचा हा हंगामातील शेवटचा महिना. 31 मेनंतर जंजिरा किल्ल्यातील प्रवासी वाहतूक समुद्र खवळतो म्हणून बंद करण्यात येते, म्हणूनच या महिन्यातील दोन आठवडे किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पुरातत्व खाते व मेरीटाईम बोर्डाने यासाठी खास नियोजनाची गरज आहे. किल्ला पाहण्यासाठी तिकीट घेता, मग पर्यटकांच्या उतरण्याची सोय करणे गरजेचे आहे. मेअखेरीस समुद्राच्या लाटांचा जोर वाढतो, परिणामी उतरण्यासाठी जेटी नसल्याने शिडाच्या बोटीतून उतरणे म्हणजे खरी कसरत आहे. बोटीतून उतरविण्यासाठी प्रशिक्षित कामगार ठेवणे गरजेचे आहे. ती जबाबदारी बोटीवाल्यांप्रमाणे शासनाचीदेखील आहे.
शासनाने 93.6 कोटी मंजूर करून किल्ल्याच्या मागील बाजूस भव्य जेटी बांधण्याचे काम दिले आहे. परंतु, मंजुरीनंतर निविदा काढून वर्ष झाले तरी अजून काम सुरु न झाल्याने स्थानिक व पर्यटक नाराज आहेत. आता पावसानंतरच कामाची सुरुवात होणार असे दिसते. मुरुडची उष्णता पाहता आज पारा 38 वर गेला आणि वातावरणतील आर्द्रता वाढल्याने पर्यटकांना घाम खूप येत असल्याने अनेक पर्यटकांना जेटीवर त्रास सुरु झाला. अशा पर्यटकांना किल्ल्यासमोर बोटीत तासभर बसवणे योग्य नसल्याने खोरा जलवाहतूक संस्थेने पर्यटकांना किल्ल्यासमोरील परिस्थिती स्पीकरवर घोषणा करून सांगितली व कडक उन्हात किल्ल्यात जाऊ नका, असे सांगण्यात आले. सायंकाळी 4 नंतर या किल्ला पाहता येईल, अशी सूचना जेट्टीवर पहिल्यांदाच करण्यात आल्याने पर्यटक नाराज झाले, परंतु सुरक्षा महत्त्वाची आहे.
पुरातत्व खाते जंजिरा किल्ला सायंकाळी 5 वाजता बंद करते, त्यामुळे 4.30 मिनिटांची शेवटची बोट किल्ल्यात जाते. त्यानंतर आलेले पर्यटक किल्ल्यात जाऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून जलवाहतूक संस्था 5 नंतर आलेल्या पर्यटकांना बोटीतून जंजिरा किल्ल्याभोवती फेरी मारून आणतात, अशी सोय सध्या सुरु केली आहे. पर्यटक त्यावर खुश आहेत.
आज मुरुडला सर्वत जास्त गरमी आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदरात तिकीट काढून तासभर उभे होतो, नंतर बोट आली आम्ही बोटीत बसून किल्ल्यासमोर गेलो; परंतु किल्ल्यात प्रवेशद्वारावर इतकी गर्दी होती की, तीन मोठ्या लॉन्च, पाच शिडाच्या बोटी प्रवासी घेऊन उभ्या होत्या. आम्हला एक तास बोटीत बसावे लागले. आमची लॉन्च असल्याने वर छपपर होते, पण शिडाच्या बोटीतील पर्यटक कडक उन्हात तापले. लहान मुले रडायला लागली. माझी विनंती आहे की, पुरतावा खात्यांनी आणि बोटधारकांनी दर रविवारी नियोजन करण्याची गरज आहे. शिडाच्या बोटींना सावलीसाठी छपराची सोय करण्यात यावी. आम्हाला किल्ला पाहून येण्यासाठी 5 तास लागले. येणाऱ्या पर्यटकांनी विचारणा करून सकाळी लवकर अथवा सायंकाळी 4 वाजता जावे.
सुचिता मांढरे, पर्यटक, पेण