| पोयनाड | वार्ताहर |
श्री स्वामी समर्थ पोयनाड विद्यमाने जिल्हास्तरीय पुरूष खुल्या गटाच्या आदिवासी व ठाकूर समाजाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन 20 मे रोजी बुधाजी चवरकर क्रीडानगरी पोयनाड येथे केले होते. चाळीस संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत जय काळकाई भपक्याचीवाडी रोहा संघाने बाजी मारली.
स्पर्धेचे उद्घाटन चित्रलेखा पाटील शेकाप महिला जिल्हा आघाडी प्रमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी भगवती नंदा नंदगिरी (माई) हरिद्वार, शकुंतला काकडे सरपंच पोयनाड, सचिन पाटील उपसरपंच पोयनाड, सुधीर चवरकर तंटामुक्ती अध्यक्ष पोयनाड, संतोष चवरकर उद्योजक आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत श्री स्वामी समर्थ पोयनाडचे प्रमुख भूषण चवरकर यांनी केले.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जयकाळकाई भपक्याचीवाडी रोहा, द्वितीय क्रमांक जय हनुमान वाघोडे, तृतीय क्रमांक जय म्हसोबा गावठाण, चतुर्थ क्रमांक श्री मरिआई प्रसन्न शेणवई रोहा यांनी पटकावला. उत्कृष्ट पक्कड सूरज जाधव शेणवई रोहा, उत्कृष्ट चढाई अविनाश लेंडी वाघोडे, प्रेक्षक हिरो सचिन पिंगळा गावठाण, सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान ललित पागारे भपक्याचीवाडी याने पटकाविला.
बक्षीस वितरण पत्रकार विजय चवरकर, भूषण चवरकर, शैलेश गायकवाड, संतोष पाटील, अरविंद चवरकर, मनोज भगत यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र पाटील भाकरवड यांनी समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, कबड्डी खेळाडु पोयनाड यांचा सहकार्य लाभले.