| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज (दि.21) सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी होणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे चित्र फारकाळ राहणार नाही.
2024 साली ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आणि किती वेळ बसवायचे, याच्या याद्या आम्ही लवकरच तयार करु, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दरम्यान, जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. तर ईडी कार्यालय असलेल्या बॅलर्ड पिअर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
जयंत पाटील हे काहीवेळापूर्वीच ईडी कार्यालयाकडे रवाना झाले, थोड्याच वेळात त्यांची चौकशी सुरु होईल. मी कायद्याला मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे कायद्यानुसार ईडी जे प्रश्न विचारेल, त्यांना मी उत्तर देईन. आयएल आणि एफएलएस प्रकरणात माझा काही संबंध नाही. या संस्थेशी माझा कधीही संबंध आलेला नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी मुंबईत येऊ नये, असे आवाहनही केले आहे.