| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील चिंचपाडा ब्रिजजवळ जेसीबी चालकाने हयगयीने व बेदरकारपणे गाडी चालवुन स्कुटीला पाठीमागुन धडक दिल्याने अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जेसीबी चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजाडे सेक्टर आर 03 येथे राहणारे जयचंद चव्हाण (47) हे आपल्या आईसोबत स्कुटी (एमएच-46-बीएल-0112) वरून जात असताना चिंचपाडा ब्रिज येथे त्यांच्या स्कुटीच्या मागुन येणारा जेसीबी (एमएच-46-बीक्यु-0243) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील जेसीबी हयगयीने व बेदरकारपणे चालवुन जयचंद यांच्या स्कुटीला पाठीमागुन धडक दिली. या धडकेत जयचंद यांची आई सनजाबी चव्हाण (70) यांच्या उजव्या पायाला, डाव्या हाताला व मानेजवळील हाडाला गंभीर दुखापत झाली. तसेच, जयचंद यांच्या डाव्या पायाला, कंबरेला व डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी जयचंद चव्हाण यांनी जेसीबी चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.