| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या चिमणीतून सकाळच्या वेळेला लाल-काळ्या रंगाचा धूर बाहेर पडतो. यामुळे डोलवी, गडब गाव काही वेळासाठी दिसेनासे होते. यामुळे कंपनी परिसरातील पंचक्रोशीत दमा, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. कंपनी प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, असे सांगितले जाते. मात्र, हे पैसे नेमके कुठे खर्ची पडतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षांत पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दमा, खोकला, ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहेत. पेण शहरातील काही प्रमुख दवाखान्यांतून याबाबत माहिती घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे गडब, डोलवी, नवेगाव, इंद्रनगर, वडखळ, कोलवे, बोरी या परिसरातील हमखास नऊ ते दहा रुग्ण दमा, खोकल्याचे आढळून येत आहेत. याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, दमा, खोकल्याचे रुग्णांमध्ये आता 20 ते 45 वयोगटातील रुग्णांची संख्या वाढत असून, ती चिंताजनक आहे. याला कारणीभूत लोहमिश्रित असलेली हवा होय. जेएसडब्ल्यू कंपनीतून मोठ्या प्रमाणात लोहमिश्रित वाळूचे प्रदूषण होत आहे. त्याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
तीन वर्षांपूर्वी मोठ्या तोऱ्यात जेएसडब्ल्यू प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की, प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक दर्जाची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यासाठी कंपनीने 2000 कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र, ही प्रदूषण यंत्रणा बसवली आहे की नाही, याबाबत ठोस माहिती कुणाकडेच नाही.
आमची प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम असून, कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होईल असे प्रदूषण होत नाही.
आत्माराम बेटकेर, जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू डोलवी