सिद्धीप्रभा फाऊंडेशन विजेते
रुपेश साळुंखे सर्वोत्तम खेळाडू
मुंबई:- प्रतिनिधी
शिवास इंटरप्राईजेस् ने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेत प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनने अंतिम विजेतेपद पटकाविले. सिद्धीप्रभाचा रुपेश साळुंखे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई सेंट्रल, बी.आय.टी. चाळ येथील महात्मा स्पोर्टस् च्या पटांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात सिद्धीप्रभाने विजय क्लबचा प्रतिकार 37-20 असा मोडून काढत विजेतेपदाचा चषक उंचाविला. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत सिद्धीप्रभाने पूर्वार्धात 14-06 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात त्याच जोशाने खेळ करीत 17 गुणांच्या फरकाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
रुपेश साळुंखेचा अष्टपैलू खेळ त्याला विशाल घाडगे व रविकांत यांची मिळालेली चढाई – पकडीची मोलाची साथ यामुळे हा विजय सोपा गेला. विजय क्लबच्या शैलेश टिकेकर, प्रथम शिंदे यांना या सामन्यात सुर सापडला नाही. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात सिद्धी प्रभानेगोलफादेवीचा 35-22 असा, तर विजय क्लबने शताब्दी स्पोर्टस् चा 31-29 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. विजय क्लबचा रोहन राज स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर सिद्धी प्रभाचा विशाल घाडगे उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.