पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पीक वाचविण्याचे आवाहन

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर श्रीवर्धनमधील भातशेतीसमोर पाण्याच्या टंचाईचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसात पडलेल्या खंडामुळे भातखाचरांमध्ये अपेक्षित पाणीसाठा राहिलेला नाही. परिणामी, वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या पिकाला पाण्याचा ताण जाणवत असून, उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी भातखाचरांमध्ये शक्यतो 5 ते 10 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पाणी उपलब्ध असल्यास नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा अन्य स्रोतांमधून पाणी वळवून पीक वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोंबी बाहेर पडणे, पोटरी किंवा फुलोरा अवस्थेतील पिकाला पाण्याचा ताण असल्यास एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फुलोरा अवस्थेत युरियाचा तिसरा हप्ता जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच द्यावा. ओलावा नसल्यास पाऊस होऊन वाफसा येईपर्यंत खत देणे पुढे ढकलावे. निमगरव्या व गरव्या भात जाती वाढीच्या अवस्थेत असल्यास तणांचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात तातडीने बेणणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version