| अलिबाग | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांमधील ॲनिमिया अर्थात रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने अकॉन वेल्फेअर फांऊडेशन यांच्या पुढाकाराने “ॲनिमिया मुक्त भारत” अभियानाला अलिबाग तालुक्यात सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी, ॲनिमियाची प्राथमिक तपासणी, आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून ॲनिमियाची लवकर ओळख आणि योग्य वेळी आवश्यक उपचार मिळावेत, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमासाठी अकॉन वेल्फेअर फांऊडेशन, शाळा प्रशासन, शिक्षक, आरोग्य पथक आणि संबंधित संस्थांच्या समन्वयातून काम केले जाणार आहे. निरोगी विद्यार्थी म्हणजे सशक्त भारत या विचाराने सुरू झालेल्या या अभियानातून अलिबाग तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला आहे.






