| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमध्ये बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेकरे गावातील शेतकऱ्याच्या पाच बकऱ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. 24 मे रोजी पहाटेच्या वेळी गोठ्यातून पळवून नेत बिबट्याने त्या फस्त केल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान वन विभागाने त्यासाठी ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले असून मारल्या गेलेल्या बकऱ्या यांचे पंचनामे वन विभागाने केले आहेत.
बेकरे हे गाव वन विभागाच्या कर्जत पश्चिम रेंज मधील गाव असून तेथील शरद हेमा कराळे यांच्या गोठ्यातील पाच बकऱ्या गायब झाल्या होत्या.24 मे रोजी पहाटे बिबट्याने त्या बकऱ्या फस्त केल्या होत्या.मात्र त्यातील एक बकरी ही अर्धवट अवस्थेत जंगलात आढळून आल्याने पहाटे लोकवस्तीत बिबटे आले असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यामुळे वन विभागाने तत्काळ बेकरे गावात येवून स्थानिक ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे सल्ले दिले आहेत. फस्त केलेल्या बकऱ्याचे पंचनामे वन विभागाकडून करण्यात आले असून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन वन क्षेत्रपाल खेडेकर यांनी दिले आहेत.तर वनपाल क्षीरसागर यांनी संपूर्ण गावात फिरून रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही पाळीव प्राण्यांना घराबाहेर ठेवू नये असे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.याच गावातील सुदाम कराळे यांच्या देखील चार बकऱ्या मागील महिन्यात बिबट्याने फस्त केल्या होत्या अशी माहिती आता पुढे आली आहे.